एक न संपणारा प्रवास ‘मागे वळून बघताना’ या विभागासाठी मी लिहावे, असे संपादकांनी पत्र पाठवले. त्यातील एक वाक्य आहे की, ‘या विभागात असामान्य आणि प्रसिद्ध व्यक्तींना लेखनासाठी निमंत्रित केले आहे.’ आता हे वाक्य स्वाभाविकच माझा अहम् काही प्रमाणात सुखावणारे आहेच. परंतु मी कशाकरता प्रसिद्ध आहे, याचे उत्तर गृहीत धरूनच हे लेखन मला करावयास सांगितले असणार. याचे उत्तर महाराष्ट्रात मला वारंवार भेटत असते. मी गेली 20 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतो, हे खरे; पण गेली 10 वर्षे मी सानेगुरुजींनी चालू केलेल्या ‘साधना’ या साप्ताहिकाचा संपादकही आहे. हे साप्ताहिक सर्वांगाने वाढते आहे. तरीही महाराष्ट्रात नव्या 100 लोकांशी परिचय झाला, तर त्यांपैकी 95 लोकांच्या मनात दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन याची गाठ पक्की बसलेली असते. त्यांपैकी बहुतेकांना ‘साधना’ माहीतही नसते. त्यामुळे मी ‘साधना’चा संपादक आहे, ही गोष्ट त्यांच्या लेखी अर्थहीन असते. खरे तर मी अनेक ठिकाणी धडपडत इथपर्यंतची वाटचाल केली. त्या सर्वांत कमी-जास्त यश मला लाभले. उदा.- मी कबड्डीचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू होतो. कबड्...