महार कोण होते? वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं…
महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः
1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते.
2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते.
4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत.
7. महार हे लढवैय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करुन महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.
8. पेशव्यांनीही अंगरक्षक, पहारेकरी म्हणून महारांनाच प्राधान्य दिले होते.
9. महार हे ग्राम, नगर, राज्यात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटील किंवा नगराध्यक्षाला देत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा. नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे आणि ती पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
10. महारांवर शेतसारा, खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी होती.
11. महार समाज अस्पृश्य गणला गेला होता.
थोडक्यात हा समाज आजच्या पोलीस, गुप्तचर आणि महसूल विभागाशी निगडीत कार्ये करत होता. महार या शब्दाची व्युत्पत्ती अनेकांनी शोधली आहे. डॉ. इरावती कर्वे म्हणतात, महार राहतात ते राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मृताहारी (म्हणजे मृत प्राण्यांचे मांस खाणारे म्हणून) या शब्दाचे महार या शब्दात परिवर्तन झाले असेही इरावतीबाईंचे म्हणणे आहे. ते मुळीच पटण्यासारखे नाही. बुद्ध धर्मात निसर्गतः मृत प्राण्याचे मांस खाण्यावर बंधन नव्हते. पण मग असे मृताहारी बुद्ध धर्माच्या ज्ञात इतिहासात अगणित झालेले असतील. त्या सर्वांनाच महार म्हटले जात नाही. केवळ महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशात या नावाची जात आहे. म्हणजे महार शब्दाचे मूळ अन्यत्र शोधावे लागेल हे उघड आहे.
महाआहारी (खूप खाणारे) असणार्या लोकांना महार म्हणू लागले अशी व्युत्पत्ती दि महार फोल्कमध्ये (रोबेर्टसन) दिलेली आहे. ती अर्थातच पटण्यासारखी नाही. दुसरे असे की महार एक जात म्हणून कोणत्याही स्मृती, पुराणांमध्ये उल्लेखिलेली नाही. अस्पृश्यांच्या यादीतही ही जात पुराणे आणि स्मृत्यांनी नोंदलेली नाही. मनुस्मृतीत निषाद, बेण, आयोमेद, आंध्र, चुंचू, धिग्वन या जातींचा उल्लेख आहे. त्यांनी गावाबाहेर राहावे असे म्हटलेले आहे. पण चांडाळ वगळता त्यांनाही अस्पृश्य म्हटलेले नाही. तैत्तिरिय ब्राह्मणानुसार आणि विष्णुस्मृतीनुसार फक्त चांडळ ही जात अस्पृश्य आहे. त्यामुळे मुळात जन्मभूत अस्पृश्यता भारतात नेमकी कधी आणि का आली, ते सांगता येत नाही.
मग प्रश्न असा उद्भवतो की की महार ही मुळात जात होती काय? महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
त्यासाठी आपण महार समाजातील प्रमुख आडनावांकडे एक दृष्टीक्षेप टाकूयात. महारांमध्ये आढाव, आडसुळे, अहिरे, अवचट, भेडे, भिलंग, भिंगार, भोसले, कांबळे, गायकवाड, पवार, कदम, शेळके, शिंदे आदी आडनावे आढळतात. या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. याचाच अर्थ हे सर्व समान आडनाव असणारे समाजघटक कधीतरी एकत्र होते. व्यवसायाच्या विभागण्या जसजशा होत गेल्या तसतशा एकाच समाजघटकातून वेगवेगळ्या जाती विभक्त झाल्या. जाती जन्माधारीत बनत गेल्याने जातीधर्म आणि समाजधर्मात काही विभाजन झाले. हा समाज मुख्य दैवतांना मानत आला आहे. (शिव, विष्णू, विठ्ठल, महलक्ष्मी इत्यादी) त्याचवेळी या समाजाची स्वतंत्र अशी दैवतेही आहेत. पण यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. अस्पृश्यतेच्या काळात अन्य मंदिरांत स्थान आणि प्रवेशच नसल्याने आपल्या धार्मिक कल्पनांनुसार लोकदैवते विकसीत होतात, हे आपण आज प्रतिष्ठा मिळालेल्या दैवतांबाबतही पाहू शकतो.
त्यासाठी सुरुवातीलाच सांगितलेले महार समाजाचे व्यवसाय पुन्हा एकदा तपासून घेऊयात.
अ) महार हे ग्रामरक्षक होते- चोर्या, दरोडे आणि आक्रमणेही परतवण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली होती. गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांना रात्रंदिवस वेशीबाहेर राहणे आवश्यकच बनले होते. त्यांच्यामुळेच वेशीआतचे लोक निर्घोर झोपू शकत होते. त्यामुळे गाव चावडीपेक्षा महार चावडीची महत्ता मोठी होती. त्यांनाच भूमिपुत्र मानले जात होते. कारण त्यांच्या साक्षीनेच तर जमिनींच्या सीमा ठरत होत्या, संरक्षित राहत होत्या.
पहिल्या सहस्त्रांतापर्यंत प्रादेशिक व्यापार मोठय़ा प्रमाणात होत असे. परक्या मुलुखातून जाताना चोर-दरोडेखोरांचा उपद्रव टाळण्यासाठी महारांची रक्षक-पथके व्यापारी सोबत बाळगत असत. महारांची ख्याती ही नेहमीच इमानी, प्रामाणिक आणि लढवैय्या अशी राहिलेली आहे. म्हणजेच गावाचे, व्यापार्यांचे रक्षण हे त्यांचे आद्य कर्तव्य आणि कार्य होते.
या दोन मुद्द्यांवरुन स्पष्ट दिसते की, महार हा शब्द महारक्षक (वा प्राकृत महारक्खित-महारक्ख) या शब्दाचा कालौघात झालेला संक्षेप आहे. हे विधान ठामपणे करण्याची दोन कारणे आहेत. महार ही जात फक्त महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशातच अस्तित्वात आहे. या भूभागावर सातवाहनांनी साडेचारशे वर्ष इतका प्रदीर्घकाळ राज्य केले. सातवाहनांनी महाराष्ट्री प्राकृत हीच आपली शेवटपर्यंत राजभाषा ठेवली. त्यामुळे जातीनामांवर महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव असणे स्वाभाविक आहे. रक्षणाचे कार्य करणारे रक्ख आणि त्यांचे प्रमुख ते महारक्ख ही उपपत्ती रठ्हांचे प्रमुख ते महारट्ठ (जे नंतर मराठे म्हणून ओळखले जावू लागले. त्यांचीही स्वतंत्र जात बनली.) या उपपत्तीशी सुसंगतपणे जुळते. पदे आलटून-पालटून असल्याने सर्वांनी महारक्ख हे नाव धारण करुन कालौघात क्ख चा लोप होऊन फक्त महार हा शब्द जातीनाम म्हणून कायम झाला असे म्हणता येते.
जी सामाजिक कर्तव्ये महार समाज पार पाडत होता त्यावरुन त्यांना महारक्ख हेच पदाभिनाम होते हे अगदी महावंदमधील काही उल्लेखांवरुनही सिद्ध होते. जी कर्तव्ये तत्कालीन राजकीय अस्थिरता, धामधूम तर कधी पूर्ण अराजकतेच्या स्थितीत अत्यंत महत्वाची होती. त्याशिवाय ग्रामाधारित समाजव्यवस्था जिवंत राहूच शकत नव्हती.
जात म्हणून उदय
महार समाजाचा जात म्हणून उदय कधी झाला याचे भौतिक, लिखित पुरावे आज आस्तित्वात नाहीत. परंतू समाजेतिहास असे सांगतो, जेव्हा नागरी व्यवस्था आकाराला येते तेव्हाच समाज आपल्यातूनच लढवैय्या व्यक्तींना नागर रक्षणासाठी नियुक्त करतो. युद्धातील सैनिक आणि नागर रक्षक यात मुलभूत फरक असतो. सैनिकाला फक्त युद्धकाळात शत्रू सैन्यावर तुटून पडण्याचे काम असते. परंतू ग्रामरक्षकाला तेच कार्य रात्रंदिवस करावे लागते. शत्रूच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी गाव, शहराभोवती कोट बांधण्याची प्रथा सिंधू काळापासून आहे. रात्री समजा कोटाची दारे जरी बंद केली तरी हल्ल्याची खबर, अगदी तटावरचे रक्षक असले तरी, लवकर लागावी म्हणून रक्षकांनी गाव, शहराबाहेरच मुक्काम ठोकावा अशी रीत निर्माण झाली असावी. याचे कारण तत्कालीन अर्थव्यवस्था मुख्यतः कृषिप्रधान होती. शत्रू नगर, गावांवर आक्रमण करताना प्रथम शेते जाळतच येत असे. ही प्रथा अठराव्या शतकापर्यंत तरी भारतात अस्तित्वात होती, हे सर्वविदितच आहे. त्यांना आधीच रोखण्याचा प्रयत्न करणे हे तर्कसुसंगत होते. त्यामुळे वेशीबाहेर या बहाद्दर असणार्या रक्षकांची वसती केली गेली असावी. सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख महारक्षक (महारक्ख) पद भूषवत असणे स्वाभाविक आहे. परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तीत झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली. संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जावू लागली असे दिसते.
1. त्या काळात प्रत्येक गावाभोवती तटबंदी, कोट असत. रात्री त्यांचा मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय गावात लुटालूट- जाळपोळ करत शिरणे हा आक्रमकांचा आणि दरोडेखोरांचाही प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र धोका पत्करुन, स्वतः आणि कुटुंबाला उघडय़ावर असुरक्षित ठेवत गावाचे रक्षण करत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांना प्राणांचे बलिदानही द्यावे लागले आहे. गावोगावी जे भडखंबे सापडतात ते अशाच संरक्षक लढायांत मारल्या गेलेल्यांची स्मारके होत.
2. महार समाज प्राचीन काळी नसला तरी उत्तरकाळात प्रायः गरीबच राहिला आहे. उघडय़ावर राहत असल्याने संपत्तीसंचय करुनही त्यांना उपयोग नव्हताच. तसे पाहिले तर ज्या गावांचे रक्षण ते प्राण धोक्यात घालून करत तेच गाव त्यांना स्वतः लुटायची बुद्धी झाली असती तरी नवल वाटले नसते. पण तसा एकही अध्याय महार समाजाच्या बाबतीत इतिहासातही दिसत नाही.
3. जमिनींचे, हद्दींचे तंटे महाराच्याच साक्षीने निकाली निघत. एवढे त्यांच्या साक्षीचे महत्व होते. परंतु (अगदी पेशवेकालीन निवाडय़ांतही) महारांनी खोटी साक्ष दिल्याचे एकही उदाहरण नाही.
4. महारांवर गावातील जमा झालेला सारा मुख्य ठाण्यांवर जमा करण्याची जबाबदारी असे. त्यात त्यांनी कधीही तो सारा मध्येच गायब केल्याचेही एकही उदाहरण नाही.
5. महार समाजावर अस्पृश्यता लादली गेली, अन्याय बंधने लादली गेली, पण हा समाज जात्याच लढवैय्या असूनही आपल्या गावाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध त्याने शस्त्र उचलले नाही.
या काही मुद्द्यांवरुन अखिल समाजाने महार समाजाबाबत किती कृतज्ञ असले पाहिजे हे लक्षात येइल.
अवनती कशी आणि का झाली?
महार समाजाला नेमके कधी अस्पृश्य ठरवले गेले याबाबत इतिहास मूक आहे. या समाजाची आर्थिक आणि सामाजिक अवनती कशी आणि नेमकी कधी झाली, हे पुराव्यांअभावी ठरवता येणे अवघड आहे. परंतू तर्काने या प्रश्नांचा उलगडा होवू शकतो.
1. गावाचे रक्षण करणार्यांना आणि जे आधी सर्वच समाजघटकांतून आले होते त्यांना आरंभापासून अस्पृश्य मानले गेले असण्याची शक्यता नाही.
2. ज्या काळात भारतांतर्गत आणि विदेशी व्यापारही भरात होता तेव्हा त्या व्यापारी तांडय़ांचे रक्षण करणार्या महाराष्ट्रातील महारांना अस्पृश्य मानले जाण्याची शक्यता नाही. किंबहुना 8व्या शतकापर्यंतच्या स्मृतीही महारांचा अस्पृश्य म्हणून निर्देश करत नाहीत. असे असले तरी महार समाजाची हळुहळू सामाजिक पातळीवर अवनती होत गेली. त्यांच्या सर्व जबाबदार्या पूर्ववत तर ठेवल्याच. पण त्यात अमानुषपणे वाढ केली गेली. त्यामुळे महारांचे कंबरडे मोडले नसले तरच नवल. यामागील कारणांचा वेधही घेणे अत्यावश्यक आहे.
जाती नव्हत्याच
वर्णसंकरातून अस्पृश्य जातींचा विकास झाला हे मनुस्मृतीचे मत मानव वंशशास्त्राने खोटे ठरवले आहे. मनुस्मृतीत वा अन्य कोणत्याही धर्मशास्त्रात महार, मातंग, धेड, परिया, चिरुमा, नामशुद्र, मेघवाल इत्यादी भारतात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचा साधा उल्लेखही नाही. याचा अर्थ 10व्या शतकानंतर कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेले.
मार्शल रेस
महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवून ठेवले असेल, याचे हेच कारण आहे की परंपरागतच मुख्यतः संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवय्येपणा, चिकाटी हे मुलभूत गुण त्यांच्यात होते. वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी त्या गुणांचे प्रदर्शन केले आहे. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करुन त्यांनी हजारो वर्ष कसे अतुलनीय कार्य केले
संजय सोनवणी
Comments
महार समाजात कीती शाखा होत्या आणि गोत्र व कुलदैवते कोणकोणती होती
याबद्दलही लेख लिहीला तर बर होईल
ly
आपल्या या इतिहासाची माहिती अजून ही 90 टक्के लोकांना माहीतच नाही ,ही माहिती आपल्या पुढच्या पिढीला महत्वपूर्ण राहील, धन्यवाद जय भीम