"आजी मला सांगत आली, बाळ, देव कुठे आहे हे कोणालाच ठाऊक नाही. मी माझ्या गेल्या ८० वर्षांच्या आयुष्यात शोधत आले, पण तो कुठेच दिसला नाही. माझ्या आईने देखील मला सांगितले होते, तिलाही तो कधीच दिसला नाही. कारण ज्यांनी वर्षानुवर्षे देवाला फुले, नारळ, महाप्रसाद अर्पण केले, त्यांना कधीच देव पावला नाही, तर मग तू १० रुपयांच्या प्रसादाने काय साधणार आहेस?
लाखो भिकारी देवळांच्या, मस्जिदींच्या दारात बसून देव-देव करत आयुष्यभर काढतात, त्यांनाही देव कधी पावला नाही. मग तुला का पावणार?
आजी सांगत होती की मी गेल्या ८० वर्षांपासून एकच गोष्ट ऐकत आले आहे: देव फक्त त्यांनाच पावतो, जे माणूसकीने जगतात, ब्राह्मणांना दान देतात, आणि इतरांच्या भल्याचा विचार करतात. पण मग शेतकऱ्यांच्या नशिबात अशी वेळ का येते की त्यांना आत्महत्या करावी लागते? जो देव लाखो लोकांचे भले करणाऱ्या शेतकऱ्याला पावत नाही, तो तुला या १० रुपयांच्या प्रसादांनी काय पावणार?
आजी म्हणाली, मला एकच देव सापडला, आणि तो म्हणजे बाबासाहेब भीमराव आंबेडकर. त्यांनी कधी कोणामध्ये भेदभाव केला नाही, सर्वांसाठी समान न्याय दिला. त्यांनी सर्व धर्मांसाठी एकच कायदा लागू केला. बाबासाहेबांना कधी कोणी प्रसाद दिला नाही, तरी त्यांनी आपल्या साठी एवढं मोठं कार्य केलं, की आपण त्यांचे आभार मानले तरी ते कमीच ठरेल.
आज त्यांच्या कारणाने बाळ, तू शाळेत जात आहेस, तुझे आई-बाबा काम करू शकत आहेत. नाहीतर आपण सगळे रोडवर 'देव देव' करत, हातात टाळ घेऊन फिरत असतो. कदाचित आपल्याला टाळ घेण्याची संधीही मिळाली नसती.
म्हणून रोज सकाळी उठून आई-बाबांच्या पाया पडणे विसरलात तरी चालेल, पण बाबासाहेबांच्या पाया पडणे कधीच विसरू नका. त्यांनीच आपलं जगणं अधिक सुलभ केलं आहे. १० रुपयांच्या प्रसादांनी कोणी पावत नाही, उपास करूनही कोणी पावत नाही. उपवासांनी देव पावला असता, तर लाखो लोक उपाशी राहून मरण पावले नसते.
म्हणून बाळ, तुला सांगते, कोणत्याही दगडाच्या मूर्तीकडे धाव घेऊ नकोस, सगळे दगड एकसारखेच असतात, फक्त त्यांचं रूप आणि मांडणी वेगळी असते.
जयभीम!
आज आपल्या देशाला बाबासाहेबांच्या विचारांची खऱ्या अर्थाने गरज आहे."
माझा लेख कसा वाटला हे नक्की कळवा, आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका!
अमोल गौतम ,शोभा भालेराव
---
Comments