महात्मा जोतिबा फुले हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते. डॉ. आंबेडकर हे जोतिबांना आपले गुरु मानत. गांधीजींनी ‘खरा महात्मा’ म्हणून त्यांचा गौरव केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांना ‘सामाजिक क्रांतिकारक’ म्हणत. दलितांसाठी आणि मुलींसाठी शाळा काढण्याच्या आपल्या हेतूच्या सिद्धीसाठी त्यांना घर सोडावे लागले. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, इशारा, सत्सार अंक १ आणि २, सार्वजनिक सत्यधर्म ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. महात्मा जोतिबा फुले
इ.स. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजची स्थापना केली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. ‘दीनबंधू’ साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
Comments