देशाच्या जलसंपत्तीबद्दल विचार करताना त्यांचा विशेष भर जलविद्युतनिर्मितीवर होता. पुरेशी वीज आणि पाणी उपलब्ध करून दिल्याशिवाय देशाची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती होणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी देशामध्ये दोन महत्त्वाच्या संस्था कार्यान्वित केल्या. त्या संस्था म्हणजे ‘सेंट्रल वॉटर कमिशन’ आणि ‘सेंट्रल इलेक्ट्रिकल ॲथॉरिटी’ त्यानंतर त्यांनी ‘सेंट्रल रिव्हर ॲथॉरिटी’ ही संस्थासुद्धा स्थापन केली. या नव्या संस्थांमधून देशाच्या पायाभूत गरजांचे प्रकल्प तयार करण्यासाठी त्यांनी फार महत्त्वाचं काम केलं. त्यातूनच ‘दामोदर खोरे प्राधीकरण’, ‘महानदी स्कीम’, ‘भाक्रा-नांगल धरण’ हे प्रचंड क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले. सध्या देशात ‘एनटीपीसी’, ‘नॅशनल ग्रीड’ यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांची उभारणी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या ‘सेंट्रल इलेक्ट्रिकल ॲथॉरिटी’मधूनच आली. एक अर्थतज्ज्ञ म्हणून डॉ. आंबेडकरांनी संपूर्ण अर्थनीतीची अत्यंत कुशलतेनं मांडणी केलेली होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात देशात काँग्रेससह इतरही राजकीय पक्ष काम करत होते. त्यामध्ये डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचाही (Independent Labour Party) समावेश होता. सन १९३६ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डॉ. आंबेडकरांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये त्यांचा अर्थविषयक कार्यक्रम स्पष्टपणे नमूद केला होता. देशाची अर्थव्यवस्था सशक्त करताना महसुलाचं वाटप केंद्र व राज्यपातळीवर कसं करावं याबाबतचं धोरण जाहीरनाम्यात अंतर्भूत होतं. देशाची औद्योगिक प्रगती होत असताना कृषिक्षेत्रातलं जास्तीचं असणारे मनुष्यबळ औद्योगिक क्षेत्राकडं आणण्यासाठी कार्यक्रमही त्यामध्ये देण्यात आला होता. कर-आकारणी करताना ती कुणाच्याही ठोक उत्पन्नावर करू नये, असाही विचार डॉ. आंबेडकरांनी मांडला होता. त्यांच्या या मूलभूत कामगिरीमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला, जलसंपदा आणि वीजनिर्मितीला आणि उद्योगाला स्वतंत्र भारतापुढची आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज करण्याचं एक ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केलं. उपेक्षित वर्गामधून पुढं आलेल्या, अत्यंत जिद्दीनं आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थकारण आणि समाजकारणातलं मूलभूत समाजपरिवर्तन घडवणाऱ्या आणि स्वतंत्र भारताला राज्यघटना देणाऱ्या या महामानवाचे असे असंख्य पैलू जेव्हा समोर येतात, तेव्हा खऱ्या अर्थानं भारतरत्न या किताबाचे मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित होतं.
महार कोण होते? वेशीबाहेर राहून गावाचं रक्षण करणारा, शेती, गावांच्या सीमा सांगणारा, व्यापार्यांना संरक्षण पुरवणारा, शेतसारा आणि राज्याचा खजिना नियोजित ठिकाणी सुरक्षित पोहोचवणारा, असा समाजाचा रक्षक म्हणजे महार समाज. पण कामाच्या स्वरूपामुळं त्यांना वेशीबाहेरच ठेवण्यात आलं… महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हणजे काय हे समजावून घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे ते असेः 1. महार समाजाचे वास्तव्य गावकुसाबाहेर होते. 2. महार समाज ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. वेशीचे रक्षण हे त्याचे नुसते कर्तव्यच नव्हे तर जबाबदारी होती. चोर नाही सापडला तर चोरीची भरपाई महारांनाच द्यावी लागत असे. 3. चोरांचा माग काढणे, गावात येणार्या जाणार्यांची नोंद ठेवणे, संशयितांना वेशीवरच अडवून ठेवणे हे त्यांचे कार्य होते. 4. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे. 5. महारांची स्वतंत्र चावडी असे आणि तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता. 6. व्यापारी जेंव्हा आपले तांडे घेवून निघत तेंव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त असत...
Comments